विंडोज 8 मध्ये नवे काय?


विशेष : 
नवीन "टाईल्स' असणारा "मेट्रो लूक'
टचस्क्रीनसाठी निर्मित
शिवाय नवनवीन प्रकारच्या उपकरणांवरही चालेल
इंटरनेट एक्‍प्लोअररच्या 10व्या आवृत्तीसोबत
डेटाची अधिक सुरक्षितता
32 व 64 बिट आवृत्ती
पण 
अगदी जुन्या कॉम्प्युटरवर विंडोज 8 चालणे अवघड ऑक्‍टोबर 2012 मध्ये येणे अपेक्षित....

ऑफिस किंवा घरातला मोठा डेस्कटॉप कॉम्प्युटर असो, की लॅपटॉप आजतरी विंडोजशिवाय पर्याय नाही. कॉम्प्युटर कोणत्याही कंपनीचा असो, प्रत्येक स्क्रीनवर विंडोजचे बोधचिन्ह झळकल्याशिवाय वापराची सुरवात होतच नाही. पूर्वी कॉम्प्युटर वापरणे क्‍लिष्ट होते. मायक्रोसॉफ्टचीच DOS नावाची गुंतागुंतीची प्रणाली वापरावी लागत असे. त्यासाठी वापराच्या सगळ्या सूचना नीट पाठ असाव्या लागायच्या. त्यामुळे केवळ तज्ज्ञांनाच त्यावेळी कॉम्प्युटर वापरणे शक्‍य होते; पण नंतर आलेली विंडोज ही प्रणाली "ग्राफिकल' म्हणजे चित्रांचा आणि चिन्हांचा वापर करत असल्याने त्याचा वापर करणे सहज शक्‍य झाले. जवळजवळ गेली पंधरा वर्षे विंडोजच्या 3.1, 95, 2,000 XP आणि विंडोज 7 या महत्त्वाच्या आवृत्त्यांनी कॉम्प्युटर जगतावर राज्य केले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही; मात्र गेल्या काही वर्षांत मोबाईलसाठी बनवलेल्या गुगलच्या अँड्रॉइड आणि ऍपल आयओएस या दोन प्रणालींनी विंडोजच्या एकाधिकारशाहीला चांगलेच आव्हान दिलेले आहे. (शिवाय लिनक्‍ससारखी मोफत असणारी प्रणालीही "टेक्‍नो' या प्रकारच्या लोकांची आवडती आहेच.) या सगळ्यामुळे मायक्रोसॉफ्ट आता विंडोज 8 ही नवी आवृत्ती बाजारात आणणार आहे. नवनवीन प्रकारच्या उपकरणांवर चालणाऱ्या या प्रणालीमध्ये काय विशेष आहे ?

इतके दिवस इंटेल आणि एएमडी या कंपनीच्या चिपसाठी मुख्यत: विंडोज बनवले जात असे. आता "आर्म' या नव्या चिपवरही विंडोज चालू शकेल. आर्म चिप मुख्यत: मोबाईल फोन किंवा टॅब्लेट पीसी सारख्या "पोर्टेबल' उपकरणांमध्ये वापरली जाते. अशा उपकरणामध्ये असणाऱ्या "टचस्क्रीन'साठी विंडोज 8 ची रचना करण्यात आलेली आहे. आजवर "आयकॉन्स'वर क्‍लिक करून प्रोग्रॅम सुरू करता येत असे. आता विंडोजवर आधारित मोबाईलफोनमध्ये असणाऱ्या प्रणालीप्रमाणे "टायटल्स'वर क्‍लिक करून किंवा बोटाच्या स्पर्शाने सुरू करता येतील. एमएस ऑफिससारखा "रिबन' या पद्धतीचा सचित्र मेनू नव्या विंडोजमध्ये असेल. शिवाय यात नव्या "पिक्‍चर पासवर्ड' सुविधेचा वापर करता येत असल्याने दुसऱ्या व्यक्तीला अनधिकृतपणे कॉम्प्युटर वापरता येणार नाही. पेन ड्राईव्ह किंवा पोर्टेबल हार्डडिस्कवर वेगाने माहिती साठवण्यासाठी युएसबी 3.0 ही यामध्ये आहे. "स्कायड्राइव्ह' ही महत्त्वाची सुविधा विंडोज 8 मध्ये आहे. या सुविधेचा वापर करून आपल्या कॉम्प्युटवरची महत्त्वाची माहिती तत्काळ इंटरनेटवरही साठवता येते. तसेच ही माहिती आपल्या विंडोज मोबाईल फोनवर किंवा इतर लोकांबरोबर "शेअर' करता येते. जरी कॉम्प्युटर बंद पडला, तरी नेटवरून चटकन डेटा मिळवता येतो. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात ही नवी प्रणाली बाजारात येणे अपेक्षित आहे. सध्या प्रचलित असणाऱ्या "ड्युएअल कोअर' किंवा "आय' याप्रकारच्या कॉम्प्युटर्सवर विंडोज ही नवी प्रणाली चालणार आहे.