अँग्री बर्डस्‌ची धमाल आता टीव्हीवरही



"अँग्री बर्डस्‌'च्या गेमने जगभरात धमाल उडवून दिलेली असताना हा रागीट पक्षी आता टीव्हीवरही कमाल दाखविणार आहे. अँग्री बर्डस्‌चे जनक असलेल्या रोव्हिओ कंपनीने "अँग्री बर्डस्‌ टून्स'ची निर्मिती केली असून, काही वाहिन्यांवर ही मालिका दाखविण्यात येत आहे. 

विविध खासगी वाहिन्यांबरोबरच व्हिडिओ ऑन डिमांडवर अँग्री बर्डस्‌चे ऍप्लिकेशन असलेल्या स्मार्टफोन आणि टॅबलेटवर चाहत्यांना ही मालिका पाहता येणार आहे. ऑस्ट्रेलियात "फॉक्‍स एट', इंडोनेशियात "एएनटीव्ही', भारतात "कार्टून नेटवर्क' आणि फिनलंडमध्ये "एम टीव्ही थ्री ज्युनोरी' आणि "एम टीव्ही थ्री' या वाहिन्यांवर अँग्री बर्डस्‌ची धमाल पाहता येईल. 2016 मध्ये अँग्री बर्डस्‌वर थ्रीडी चित्रपट प्रदर्शित करण्याची योजनाही कंपनीने आखली आहे. 

रोव्हिओ ऍनिमेशनचे प्रमुख नीक डोरा यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिका तयार करण्याचे नियोजन केले होते. कार्टून मालिकेबद्दल डोरा यांनी आनंद व्यक्त करीत श्रोत्यांना अँग्री बर्डस्‌मधील पात्र कार्टूनरूपात पाहताना नवा अनुभव मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. ही मालिका तयार करताना कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे त्यांनी नमूद केले. अँग्री बर्डस्‌ची 52 भागांची मालिका असणार असून, ती वर्षभर सुरू असेल. मोबाईलवर सध्या अँग्री बर्डस्‌च्या अप्लिकेशनला सर्वाधिक मागणी आहे. आजच्या दिवसअखेरपर्यंत जगभरात 1.7 अब्ज वेळेस अँग्री बर्डस्‌चे ऍप्लिकेशन डाऊनलोड झाले आहे. अँग्री बर्डस्‌ कपडे, खेळणी, गेम्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मीडिया पार्टनर, अँग्री बर्डस्‌च्या विविध वस्तूंना जगभरातून मागणी आहे. कंपनीचा ब्रॅंड अँग्री बर्डस्‌ हा श्रोत्यांच्या निखळ मनोरंजनाचे आगार आहे, असे रोव्हिओचे सीईओ मायकल हेड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या