जादूटोणाविरोधी कायदा लागू

बहुचर्चित जादूटोणाविरोधी कायद्याचा चौदा वर्षांचा "वनवास' आज अखेर संपला. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राज्य सरकारने काढलेल्या मसुद्यावर सही करत या कायद्याचा अध्यादेश जारी केला. यामुळे, राज्यात आजपासून जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ता. 21 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाने प्रलंबित जादूटोणाविरोधी अध्यादेश काढला होता. राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे हा अध्यादेश पाठवल्यानंतर आज सायंकाळी त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने या अध्यादेशाचे तात्पुरत्या स्वरूपात कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे, राज्य सरकारला पुढील सहा महिन्यांत या अध्यादेशाचे विधेयक विधिमंडळात मंजूर करावे लागेल. नागपूर येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात हा अध्यादेश विधेयकाच्या रूपाने दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. 

राज्यपालांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश जारी केल्याने राज्यात आजपासूनच भूत-भुताटकी, चेटूक उतरविण्याच्या नावाखाली व्यक्‍तीला मारहाण करणे, काठी अथवा चाबकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पिण्यास देणे, मिरचीची धुरी देणे, छताला टांगणे, दोर अथवा केसांनी बांधणे, केस उपटणे, चटके देणे या अमानुष कृत्यांवर बंदी आली आहे. असे कृत्य करणाऱ्यांना या अध्यादेशाच्या आधारे तुरुंगात जावे लागणार हे नक्‍की झाले आहे. 

हे ठरणार आजपासून गुन्हा... 
- तथाकथित चमत्काराचा प्रयोग करून अर्थप्राप्ती करणे, लोकांना फसवणे, ठकवणे आणि दहशत बसवणे. 
- अलौकिक शक्‍तीची कृपा व्हावी यासाठी जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, शरीराला जखमा करणे. 
- मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत शोधण्याच्या बहाण्याने करणी, भानामती नावाने अघोरी कृत्य करणे. 
- जारणमारण यांच्या नावाने नरबळी देणे, अथवा प्रयत्न करणे. 
- शरीरात अतींद्रिय शक्‍ती असल्याचे भासवून इतर व्यक्‍तींच्या मनात भीती निर्माण करणे. 
- एखादी व्यक्‍ती करणी, जादूटोणा करते, भूत लावते, मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून संशय निर्माण करणे. 
- चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्‍तीला मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे. 
- भूत-पिशाच्चांना आवाहन करीन, अशी धमकी देऊन जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे. 
- कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास उपचारांपासून रोखणे, प्रतिबंध करणे. त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे बांधणे. 
- विकलांग व्यक्‍तीमध्ये अलौकिक शक्‍ती असल्याचे भासवून तिचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या