फुलझाडांचा टांगता बगीचा!

घरात किंवा गच्चीमध्ये बाग फुलवण्याची अनेकांना हौस असते. यामध्ये काय वेगळं करता येईल याचाही प्रयत्न केला जातो. तुमच्या बागेला वेगळेपण आणि सौंदर्य देण्यात शिंकाळी अर्थात हँगिंग बास्केट नक्कीच उपयोगी पडतील. 

फुलझाडांची टांगती शिंकाळी (हँगिंग बास्केट) म्हणजे बागेतील खास गोष्ट. ही शिंकाळी दिसतात सुंदरच; शिवाय त्यांचा प्रभावही खूप पडतो. वास्तू लहान असो वा मोठी, फुलझाडांच्या शिंकाळ्यांनी ती सुशोभित होते. अगदी लहान जागेत अडकवलेलं एखादं शिंकाळंही त्या जागेचं सौंदर्य वाढवतं. त्यामुळे वातावरणात सजीवता निर्माण होते आणि मनही प्रसन्न होतं. 

यांचा वापर कुठंही होऊ शकतो. घरगुती बागा, फ्लॅटच्या घराच्या बाल्कनीतील सज्जे, टेरेसे अशा ठिकाणी, बंगला असल्यास बंगल्याच्या पुढील भागातील पोर्चमध्ये, मागील भागात भिंती, कमानींवर त्याचप्रमाणे खिडकी, दारं, चौकट, पडवी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही शिंकाळी अडकवता येतात. वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जवळपास अंतरावर अडकवलेली ही शिंकाळी स्वतःचीच एक बाग निर्माण करतात. तुमच्याकडे बागेसाठी जागा नसेल, तर छोटी बाल्कनी, सज्जा, टेरेसमध्ये या फुलझाडांच्या शिंकाळ्यांची छोटीशी बाग तयार करता येईल. 

पुरेसं अन्न, पाणी, पाण्याचा योग्य निचरा, हलक्या हातानं केलेली खुरपणी, स्टेरॅमिलसारख्या खतांचा अल्पप्रमाणातील वापर अशा प्रकारे या शिंकाळ्यांची निगराणी केली जाते. फुलझाडांसाठी वापरण्यात येणारी शिंकाळी त्रिकोणी किंवा गोलाकार आकाराची असून, त्या सर्वसाधारणपणे ८ ते २४ इंच लांबी-रूंदीच्या असतात. शिंकाळ्याची उंची कमी असल्यानं छोट्या-वनस्पती किंवा सीझनल फुलझाडांची लागवड त्यामध्ये केली जाते; कारण या वनस्पतींची मुळं खोलवर जमिनीत जात नसल्यानं त्यांना ती जागा पुरते. वनस्पतींना आर्द्रता आणि आधार मिळण्यासाठी मॉसचा वापर केला जातो. नारळ्याच्या झावळ्या आणि त्यांचा मऊ भाग यांचाही यासाठी उपयोग होतो. तारेच्या जाळ्या, प्लास्टिक, वायर, जाड वेताच्या मटेरियलनं या टोपल्या किंवा शिंकाळी बनवली जातात. या छोट्या कुंड्यांना खाली ३-४ भोकं पाडून पाण्याचा निचरा केला जातो. 

खत, माती घालून तयार केलेल्या या शिंकाळ्यात एकाच प्रकारचं फुलझाड किंवा २-३ वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावू शकतो. ज्या वनस्पतींना भरपूर फुलोरा येतो किंवा ज्या वाढून सर्वत्र पसरू शकतात अशा वनस्पतींचा वापर आवर्जून करावा. एकाच शिंकाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावून रंगसंगती निर्माण केली जाते, तेव्हा मधोमध उंच, सरळ वाढणाऱ्या वनस्पती आणि शिंकाळ्याची बाजूनं किंवा कडेनं पसरून, वाढून खाली लोंबकळणारी फुलझाडं लावावीत. ठराविक उंचीपर्यंत वाढल्यानंतर फुलझाडांची टोकं छाटून आणि बाजूनं कडेनं वाढलेल्या वनस्पतींची छाटणी करून शिंकाळी मेंटेन करावीत. त्यामुळे एकसूत्रता निर्माण होईल. 

हँगिंग बास्केटनं घर सजवण्यासाठी टिप्स... 

रंगसंगतीः सर्वांत प्रथम दृष्टीस पडतात, ते फुलझाडांचे रंग आणि रंगसंगती. त्यामध्ये विरुद्ध रंगाचे उदा. पिवळा-जांभळा किंवा नारंगी-निळा असं काँबिनेशन तयार करून प्रमाणबद्ध योजनेचा दृश्य परिणाम साध्य होईल. लाल, पिवळा, निळा रंग हे परिणाम साधतातच; शिवाय विरुद्ध चंदेरी-पांढरा यांचं गडद जांभळ्या किंवा निळ्या रंगात काँबिनेशन केल्यास उठून दिसतं. शिंकाळ्यात वनस्पती लावताना अशाप्रकारे रंगसंगतीचा विचार करावा. 

शिंकाळ्यांची योजना फार महत्त्वाची ठरते, ती वनस्पतीच्या फॉलिएजमुळे. फॉलिएजमुळे वनस्पतींना स्थिरता येऊन आकर्षक परिणाम साधला जातो. 

प्रमाणबद्धताः गर्दी किंवा दाटी न होता एकाच किंवा २-३ वनस्पतींचे एकत्रित वाढून भरगच्च फुलणं शिंकाळ्यास उठाव आणतं. 

हँगिंग बास्केट दृष्टीच्या सर्व बाजूनं अपील होईल अशाप्रकारे तयार करून त्याची मांडणी करावी. तुमच्या नजरेच्या टप्प्यात येण्याच्या उंचीवर बास्केटची मांडणी करावी. उंच वाढणाऱ्या सरळ वनस्पती आधारासाठी आणि खाली वाढणाऱ्या वनस्पती समतोल साधणाऱ्या असतात.
उर्मिला अत्रे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या