माणसाला अदृश्य करण्याचा प्रयोग यशस्वी

माणसाला अदृश्य करण्यात वैज्ञानिकांनी यश मिळवले असून प्रत्यक्षात एखादी वस्तू अदृश्य करणे म्हणजे प्रकाशीय आभासाचा खेळ असतो. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला दिसते तेव्हा तिच्यावर पडलेले प्रकाशकिरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात व त्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसत असते. माणसाला किंवा एखाद्या वस्तूला अदृश्य करताना त्या वस्तूवर पडणारे प्रकाशकिरण हे तिला वळसा घालून जातात त्यामुळे ती आपल्याला दिसत नाहीत. या तंत्राचा वापर शत्रूला जहाजे दिसू नयेत यासाठीही करता येतो. माणूस अदृश्य होऊ लागला तर त्याचे काय परिणाम होतील याच्या कल्पनाच केलेल्या बऱ्या, पण तूर्त वैज्ञानिकांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का संस्थेतील मेंदूवैज्ञानिकांनी हा प्रयोग केला. त्यात सव्वाशेजण सहभागी झाले होते, त्यांच्या तोंडावर एक डिस्प्ले लावला होता व नंतर त्या व्यक्तींना खाली त्यांच्या शरीराकडे पाहण्यास सांगितले असता त्यांना त्यांचे शरीर न दिसता मोकळे अवकाश दिसले याचा अर्थ त्यांचेच शरीर त्यांना दिसत नव्हते. तो अर्थात प्रकाशीय आभास होता. एच. जी. वेल्स या विज्ञान कादंबरीकाराने 'द इनव्हिजिबल मॅन' या कादंबरीत एक माणूस कसा अदृश्य होतो व नंतर वेडय़ासारखा बेफाम वेगाने गाडी चालवत सुटतो याचे वर्णन केले आहे.
आपलेच शरीर अदृश्य करण्याचा हा प्रयोग वैज्ञानिकांनी सहभागी व्यक्तींवर मोठय़ा पेंटब्रशचा वापर करून यशस्वी केला आहे, एका मिनिटात अनेक सहभागी व्यक्तींना त्यांनी अदृश्य करून दाखवले, त्यांना फक्त पेंटब्रश दिसत होता पण शरीर दिसत नव्हते असे आरविद गुटेरस्टॅम यांचे म्हणणे आहे.
त्यांनी सांगितले की, यापूर्वीच्या अभ्यासात आम्ही अशाच प्रकारे एक हात अदृश्य केला होता. आताच्या अभ्यासात त्याच पद्धतीचा विस्तार करून १२५ व्यक्तींचे शरीर अदृश्य केले. या व्यक्तींना चाकू खुपसण्याचा आभासही दाखवण्यात आला तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला पण तो आभास नाहीसा होताच ते पूर्ववत झाले. थोडक्यात त्या व्यक्तींना अवकाशात चाकू खुपसण्याची कृती पाहूनही घाम फुटला त्याअर्थी मेंदूने खरोखर चाकू खुपसला जातो आहे असा अर्थ लावला.
या व्यक्तींना अदृश्य अवस्थेत अनोळखी व्यक्तींसमोर उभे केला असता त्यांच्यावरील परिणाम तपासण्यात आला असता अदृश्य अवस्थेत त्यांचे हृदयाचे ठोके कमी झालेले निरीक्षणात दिसून आले. तसेच त्यांच्यावरील मानसिक ताणही वाढलेला होता असे गुटेरस्टॅम यांनी सांगितले. सामाजिक नैराश्याची जी लक्षणे असतात त्यावर उपचारांसाठी पुढे याचा उपयोग होऊ शकेल. त्याचा पुढे वैद्यकीय संशोधनात फायदा होईल, जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास
एच. जी. वेल्स या विज्ञान कादंबरीकाराने द इनव्हिजिबल मॅन या कादंबरीत अदृश्यतेची कल्पना मांडली होती.
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का संस्थेतील प्रयोग.
* वस्तूवर पडलेले  प्रकाशकिरण परावर्तित न होता वस्तूला वळसा घालून जातात.
* जहाजे अदृश्य करण्यासाठी तंत्राचा वापर.
* १२५ व्यक्तींवर प्रयोग यशस्वी.
* सामाजिक नैराश्य व भीतीच्या भावनेचा अभ्यास करण्यात मदत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या