हसत खेळत व्यायाम

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यंदा मुलांना वेगवेगळ्या शिबीरात अडकवण्याऐवजी व्यायामाची सवय लावली तर? 

वाढ‌त्या वयांच्या मुलांसाठी शरीराची किमान हालचाल गरजेची असते. अगदी लहान वयापासूनच हलक्या फुलक्या व्यायामाची सवय मुलांना लावली तर त्यांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतं. अगदी ३ वर्षांपासूनच तुम्ही मुलांना थोड्याथोड्या व्यायामाची सवय लावू शकता. व्यायाम केल्यामुळे मुलं दमतात त्यांना भूक लागते. त्यांच्या पोटात कोणत्याही सबबींशिवाय अन्न जातं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांची वाढ चांगली होते. आरोग्य उत्तम राहतं. 

मुलांचे व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करायचे अवजड किंवा अवघड व्यायाम नव्हेत. त्यांच्यासाठी व्यायाम म्हणजे थोडीशी हालचाल. मुलांना घरात बसवून ठेवण्यापेक्षा मोकळ्या मैदानात खेळायला घेऊन जा. धावणं, उड्या मारणं, फुटबॉल किंवा चेंडूने खेळायला लावणं अशा गोष्टी तुम्ही त्यांना करायला लावू शकता. मुलांच्या शाळेतल्या विविध क्रीडामहोत्सवांसाठी प्रोत्साहन द्या. मुलं खेळासाठी करणा‍ऱ्या प्रयत्नांना दादही द्या. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर व्यायामाची जबरदस्ती नको. त्यांना व्यायामाचा तिटकारा येईल, असं काहीही करू नका. किंवा मोठ्यांसाठी जसं व्यायामाचं काटेकोर वेळापत्रका आखलं जातं तसं मुलांसाठी ठेऊ नका. उलट त्यांचा व्यायाम अधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न करा. सोपी योगासनं, जिम्नॅस्टिक्सचं मुलांना प्रशिक्षण द्या. फुटबॉल, क्रिकेटसारखे मैदानी खेळ खेळायला लावा. या सर्वांमुळे आपल्या शरीराचा तोल कसा राखावा, खेळताना डोळे आणि हात-पायांचा योग्य समन्वय कसा राखावा, या गोष्टी मुलं आपोआप शिकतील. मुलांचं टीव्ही पाहणं, त्यांचा अभ्यास, कॉम्प्युटर वा व्हिडीओ गेम्स या सा‍ऱ्या गोष्टींतून व्यायामालाही वेळ काढा. गृहपाठ, खेळ आणि व्यायाम याचं योग्य ते वेळापत्रक बनवा. 

व्यायामाचे फायदे 
हाडं आणि स्नायू बळकट होतात. 
शारीरिक क्षमता वाढते. 
आत्मविश्वास वाढतो. 
एकाग्रता साधता येते. 
ताण कमी होतो. 
झोप छान लागते. 
आजारांची शक्यता कमी होते. 
मुलांसाठी सोप्पे व्यायाम 
सायकल चालवणं 
कुत्र्याला फिरायला नेणं 
पतंग उडवणं 
पोहणं 
उड्या मारणं 
नाचणं 
मित्र-मैत्रिणींसोबत मैदानावर खेळणं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या