लग्न तर हवे, पण जबाबदारी नको?

मी अठ्ठावीस वर्षांचा नोकरदार तरुण आहे. माझे नुकतेच रीतसर स्थळ पाहून लग्न ठरले आहे. लग्न करायचे नाही, असा माझा कधीच विचार नव्हता. चारचौघांसारखे माझेही स्वतंत्र कुटुंब असावे, असे मला नेहमी वाटत असे. प्रत्यक्ष लग्न ठरल्यावर मात्र मला टेन्शन आले आहे. 'कुटुंबाचा कर्ता पुरुष' वगैरे काय म्हणतात तो मी असणार, कुटुंबाची प्रत्येक आर्थिक जबाबदारी, बायको- मुलांचे लहान लहान प्रश्न या सगळ्याचे उत्तर मला आणि मलाच शोधावे लागणार या विचाराने डोक्यावर फार ओझे आल्यासारखे वाटते.    
उत्तर- योग्य वयात योग्य निर्णय घेऊन पुढे जायचं ठरवलं म्हणजे खरं तर निम्म्यापेक्षा जास्त लढाई जिंकल्यासारखीच आहे की! याचा अर्थ असा नव्हे की जे असा प्रातिनिधिक निर्णय घेत नाहीत ते कुठेतरी कमी आहेत, किंवा नॉर्मल नाहीयेत, वगरे. फक्त त्यांचे प्रश्न वेगळे असू शकतात, इतकंच. 
खरं म्हणजे मानसिक गोष्टींमध्ये कुठलंही मत किंवा सल्ला द्यायला तुमच्या पाश्र्वभूमीतल्या आणखी खूप गोष्टींची माहिती लागते. विकासाच्या टप्प्यांवरचे तुमचे अनुभव, त्या वेळच्या अन् आताच्या त्यावरच्या भावना, अन् प्रत्यक्ष मदत कुणी केली हे सगळे मोलाचे प्रश्न आहेत. आतापुरतं मला इतकं विचारू दे की तुम्हाला परीक्षेचं टेन्शन यायचं का, अन् लग्न म्हणजे तुम्हाला परीक्षा वाटते का?,  तर मग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, लग्न म्हणजे वाढलेल्या जबाबदाऱ्या तर आहेतच, पण परीक्षा नाहीये. अन् असलीच तर ती तुम्हाला एकटय़ाला द्यायची नाहीये. तुमच्या पत्नीचीपण तुम्हाला मोलाची मदत असेल. अन् तीही विनामूल्य! अर्थात बायको-मुलांच्या प्रश्नांना 'लहान-लहान' समजणे हे मात्र धोकादायक असू शकेल. ते प्रश्न महत्त्वाचे आहेत हे नीट समजून घेऊन प्रेमानं सोडवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आनंद, समाधान वाटेल. अन् 'कुटुंबाचा कर्ता पुरुष' म्हणून स्वत:विषयी अभिमानसुद्धा! पण इथेसुद्धा एक गल्लत करू नका. तुम्ही 'कर्ता पुरुष' म्हणजे घरातल्या स्त्रीची जबाबदारी कमी समजलात की काय? तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांचे प्रश्न सोडवलेत, अन् आनंदपण वाटून घेतलेत, तर पारंपरिक पुरुषप्रधान कित्ता न गिरवता नवीन काहीतरी घडवल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल. तेव्हा व्हा तर पुढे, अन् करा गृहस्थाश्रमात प्रवेश!
डॉ. वासुदेव परळीकर paralikarv2010@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या